मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या गावी मुक्कामी आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावातच ते तीन दिवस मुक्काम करत आहेत. यावेळी त्यांनी एक्सवर (ट्विटर) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या ट्विटमधून त्यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीची धावपळ, प्रचार सभा या सगळ्यातून थोडा वेळ मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे दरेगावी गेलेत. तिथे शेतातील पिकांची पाहणी त्यांनी केली. जनावरांना खाऊ घातलं. मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. पण हा व्हिडिओ शेअर करताना शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
परदेशी कशाला जायाचं गड्या आपला गाव बरा शेत पिकाची दुनिया न्यारी वसे जिथे विठूरायाची पंढरी…लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते.
