ससून रुग्णालय ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण; हळनोर याने महिला आणि 2 व्यक्तींचे नमुने घेतल्याची माहिती

पुणे हिट अँड रन प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडून टोकाचे प्रयत्न झाले. अनेक नियमबाह्य गोष्टी करण्यात आल्या. पैशाच्या जोरावर कायद्याला धाब्यावर बसवण्याचा प्रयत्न झाला. पण मीडियाने हे प्रकरण लावून धरल्यामुळे सुदैवाने या सगळ्या गोष्टी उघड झाल्या. अल्पवयीन आरोपीच चक्क ब्लड सॅम्पल बदलण्यात आलं. जेणेकरुन, अपघाताच्यावेळी तो दारु पिऊन गाडी चालवत होता, हे सिद्ध होणार नाही. पुण्यातील ससून रुग्णालयात रक्ताचे हे नमुने बदलण्यात आले.ससूनमधील या ब्लड फेरफार प्रकरणात पोलिसांनी डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हळनोर आणि शिपाई घटकांबळे या तिघांना अटक केली आहे.

ससून रुग्णालय ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात हळनोर याने महिला आणि 2 व्यक्तींचे नमुने घेतल्याची माहिती मिळत आहे. डॉ. सापळे समितीच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ससून मध्ये संबंधित विभागातील डॉक्टरांनी अल्पवयीन कार चालकाचे ब्लड सँपल घेतले होते. मात्र ऐनवेळी आलेल्या खासगी इसमांनी संबंधित डॉक्टरांवर दबाव टाकत हे ब्लड सँपल बदलण्यास भाग पाडल्याची माहिती मिळत आहे. दोन वयस्कर व्यक्तींच्या रक्ताचे नमुने हळनोरने घेतले होते. तसेच अन्य एका महिलेच्या रक्ताचे नमुनेही या अल्पवयीन मुलाच्या रक्ताऐवजी घेतले होते. याच महिलेचं रक्त या मुलाच्या रक्ताचे नमुने म्हणून तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं.

पुणे ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने हेराफेरी करणाऱ्या डॉक्टरांना लाखो रुपये पुरवणाऱ्य मकानदार नामक व्यक्तीचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. मकानदार यांनी मोठी आर्थिक रक्कम ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टर अजय तावरे याला दिली असल्याची माहिती समजते. ब्लड सॅम्पल प्रकरणात विशाल अग्रवाल याच्याकडून मकानदारने रक्कम डॉक्टर तावरे यांच्याकडे सुपूर्द केली. मकानदार पुणे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ब्लड सॅम्पल हेराफेरी प्रकरणी मोटा उलगडा होण्याची शक्यता आहे. अजय तावरे याला दिलेल्या मोठ्या आर्थिक रकमेची मिळणार माहिती त्याच्याकडून मिळेल.