दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर निर्णय दिलेला नाही. याचिकेवर 5 जूनला निर्णय सुनावला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना 2 जूनला तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण करावं लागणार आहे. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 10 मे रोजी निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केली होता. त्यांचा जामीन 2 जूनला संपत असून, रविवारी आत्मसमर्पण करावं लागणार आहे.
अरविंद केजरीवाल हे मद्य धोरण घोटाळयाप्रकरणी जामीनावर बाहेर आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना अंतरिम जामीन देण्यात आला होता. मात्र, २ जून रोजी त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यातून पळ काढण्यासाठी म्हणून अरविंद केजरीवाल यांची न्यायालयात धावाधाव सुरू होती. जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवण्यासाठी केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत त्यांना दणका दिला. जामीन मिळावा यासाठी केजरीवालांनी राऊज एव्हेन्यू कोर्टात धाव घेतली होती.
यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हेही ऑनलाइन सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यांनी असा युक्तिवाद केला की, काल शुक्रवारी केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन 2 जून रोजी आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले होते. दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर राऊस एव्हेन्यूच्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सुनावणी पूर्ण झाल्याचे सांगितले. आता अंतरिम जामिनावर न्यायालय 5 जून रोजी निकाल देणार आहे.
दरम्यान अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडताना एन हरिहरन यांनी म्हटलं होतं की, ईडीला जी व्यक्ती आजारी आहे किंवा ज्याची प्रकृती खराब आहे त्याला कोणतेही उपचार मिळणार नाहीत असं सुचवायचं आहे का? कलम 21 अंतर्गत आम्हाला अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाने आम्हाला जामीन अर्ज दाखल करण्याची सूट दिली होती. त्याच आधारे आम्ही नियमित आणि अंतरिम जामीन मागितला आहे. अरविंद केजरीवाल आपल्या प्रकृतीमुळे नियमित नव्हे तर अंतरिम जामीनाची मागणी केली आहे. 1994 पासून ते डायबेटिजचे पेशंट आहेत. त्यांना रोज इंसुलिन घ्यावं लागत आहे.
