देशाचा कारभारी ठरणार, लोकसभा निवडणुकीची आज मतमोजणी

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेची सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडलीय. इंडिया आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष राज्यासह देशभरात पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभेचा आजचा निकाल पाहण्याची देशभरातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली असून ८ वाजता मतमोजणी सुरु झाली आहे.

देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्र राज्यात पाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया झाली. १९ एप्रिल रोजी निवडणुकीचा पहिला टप्पा झाला. त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या पाच टप्प्यात महाराष्ट्रातील ४८ मतदार संघात मतदान झाले. त्यानंतर सहावा टप्पा २५ मे रोजी तर शेवटचा टप्पा १ जून रोजी झाला. देशात इंडिया आघाडी आणि एनडीए यामध्येच प्रमुख लढत होती. एनडीएचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तर इंडिया आघाडीची बाजू राहुल गांधी यांनी सांभाळली. चार जून रोजी लोकसभा निवडणुकांसोबत आंध्र प्रदेश आणि ओडिसा विधानसभेची मतमोजणी होणार आहे.

देशातील सर्वच एग्झिटपोलनुसार पुन्हा एनडीएकडे सत्तेची सूत्र जात आहे. सलग दहा वर्षे सत्तेत राहून देशात भाजप विरोधी वातावरण झालेले नाही. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीचा प्रभाव पडलेला दिसून येत नाही. सर्वच संस्थांनी ३५० पेक्षा जास्त जागा एनडीएला मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला १२५ ते १५० पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज आहे. लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालापूर्वी आणि एक्झिट पोलनंतर दिल्लीत हालचाली वाढल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. देशात सर्वच ठिकाणी निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.

गुजरातमधील सूरत इथं परिस्थितीच अशी तयार झाली, की इथं निवडणुकीचीच गरज भासली नाही आणि भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय जाहीर करण्यात आला, गुजरातच्या राजकीय इतिहासात आतापर्यंतची ही पहिलीच घटना असून, पहिल्यांदाच निवडणूक न घेता इथं उमेदवाराचा बिनविरोध विजय घोषित झाला.