जळगाव, रावेरमध्ये भाजपचीच हवा; दोन्ही जागांवर आघाडीवर

रावेर लोकसभा मतदारसंघाचे सकाळी 10 वाजेपर्यंतचे कल हाती आले असून भाजपच्या रक्षा खडसे या 74,912 मतांनी आघाडीवर आहेत. तर विरोधी उमेदवार राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील हे पिछाडीवर आहेत. हा कल सकाळी 10 वाजेपर्यंतचा असून अजून अंतिम निकाल हाती येण्यास काही वेळ लागेल.

जळगावमधील रावेर आणि जळगाव या दोन्ही मतदारसंघात भाजपने आघाडी घेतली आहे. निकालाचे पहिले कल हाती आले असून रक्षा खडसे आणि स्मिता वाघ आघाडीवर आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यावेळी या मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ या महायुतीच्या उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली. आतापर्यंत समोर आलेल्या आकड्यांनुसार सध्या करण पवार यांच्यापेक्षा स्मिता वाघ या 15,225 मतांनी आघाडीवर आहेत. करण पवार यांना 14477 तर स्मिता वाघ यांना 29702 मतं मिळाली आहेत.

एकनाथ खडसेंच्या भूमिकेमुळे यंदा रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाणार अशी चर्चा होती. मात्र केंद्रीय नेतृत्वाने त्यांनाच तिसऱ्यांदा संधी दिली. रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या आणि शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर सुरुवातीला दिसून आला. तर गेल्यावेळी काँग्रेसकडे असलेली ही जागा यावेळी शरद पवारांनी स्वतःकडे घेत नवखा उमेदवार दिला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे 1700 मतांनी आघाडीवर आहेत तर मविआचे विनायक राऊत मागे पडले आहेत. तर रायगड लोकसभा मतदारसंघातून तिसर्‍या फेरीअखेर सुनील तटकरे 10,600 मतांनी पुढे आहेत.