मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आज पासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसणार होते, पण आता जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण पुढे ढकललं आहे. सरकारने उपोषणाची परवानगी नाकारली आहे, आचारसंहिता चालू असल्याने आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे, त्यामुळे जरांगे पाटील यांनी आंदोलनाची तारीख पुढे ढकलली आहे. जरांगे पाटील यांचं आंदोलन आता 4 दिवसांनंतर म्हणजेच 8 जूनपासून सुरू होणार आहे.
निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसणार होते. मात्र, अंतरवाली सराटी गावातूनच त्यांना विरोध होत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गावातील उपसरपंचांसह 70 जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जरांगेंच्या आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचे म्हटले. त्यानंतर, आता जरांगे यांनी तुर्तास आपले आंदोलन स्थगित केले आहे. आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल केले जातील, म्हणून सावध भूमिका घेत जरांगेंनी उद्याचं आंदोलन स्थगित केल्याची माहिती आहे. तसेच, अंतरवाली सराटी येथील ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळेही हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली होती, पण गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामुळे उद्याचं आंदोलन स्थगित केलं नसल्याचे जरांगे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यामुळे उद्याचं उपोषण स्थगित करत आता गाव सोडून दुसरीकडे उपोषण करणार आहे, माझ्यासाठी गावकरी अडचणीत येणार नाहीत, यासाठी हा निर्णय़ घेत असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. आंदोलनाला परवानगीची गरज नाही, तरीही आपण वेळोवेळी पत्र दिलेलं आहे. परवानगी आम्ही 10 महिन्यांआधीच काढली. उपोषणाची परवानगी प्रशासनाने नाकारली. संध्याकाळी 6 पर्यंत आचारसंहिता आहे, त्यामुळे परवानगी देण्यात आली नाही. आचारसंहितेमध्ये आंदोलन करता येणार नाही, मी आचारसंहितेचा सन्मान आणि आदर करतो, असं जरांगे म्हणाले.
