राज्यात पुण्यासह १५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

जून महिन्याची सुरुवात झाल्या क्षणापासून पावसाचं आगमन कधी होणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा कमी होण्याचं नाव घेत नसल्यामुळ आता सूर्याचा प्रकोप असह्य होताना दिसत आहे. पुढील 24 तासांच्या हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी लागत असून आज राज्यात पुण्यासह १५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धारशिव, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा यांचा समावेश आहे. तर कोकणातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान राहणार असल्याचे हवामान विभागाने नोंदवले आहे.

चक्राकार वाऱ्यांची बंगालच्या उपसागरात सक्रीय स्थिती असल्याचे हवामान विभागाने सांगितले. राज्यात पालघर आणि ठाणे जिल्ह्यात उष्ण व दमट हवामान राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह हलक्या व मध्यम सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहण्याची शक्यता आहे.

अशा मोसमी बदलामुळे शेतकऱ्यांवरही विपरीत परिणाम होतात. पिकांचे नुकसान होऊ शकते, शेतीची नासाडी होऊ शकते. अशा वेळी शेतकऱ्यांनी पिकविम्याचा लाभ घेणे आणि शेतीच्या कामांमध्ये विलंब करणे उचित ठरेल. तसेच जनावरांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.