जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत राज्यातील राजकीय वातावरण बदलताना दिसत आहे. आज झालेल्या मतमोजणीत राज्यातील दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात पीडीपीच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना मोठा झटका बसला आहे.
दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. बारामुल्लाच्या जागेवर अपक्ष उमेदवार अब्दुल रशीद शेख यांनी विजय मिळवला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून विजयाची आशा असल्याचे सांगितले होते. पण त्यांनी आपला पराभव स्वीकारला असून अब्दुल शेख यांना विजयाच्या शुभेच्छा ही दिल्या आहेत.
या निवडणुकीत भाजप आणि ‘एनसी’ला प्रत्येकी एक जागा गमवावी लागली आहे. दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याच्या आरोपावरून गेल्या चार वर्षांपासून तिहार कारागृहात असलेले कुपवाडाचे माजी आमदार इंजिनिअर रशीद यांचा विजय हा सर्वात मोठा चमत्कार आहे. रशीद यांनी उमर अब्दुल्ला यांच्यावर दोन लाख तीन हजार 40 मतांची आघाडी घेतली. दोन लाख 98 हजार 125 मतांनी त्यांनी सज्जाद गनी लोन यांना मागे टाकले. मात्र, रशीद यांची सुटका होण्याची फारशी शक्यता नसल्याने संसदेत जनतेचे प्रतिनिधित्व करताना ते दिसणार नाहीत, हेही त्यांनी संदेशात आवर्जून नमूद केले आहे.
काश्मीरमधील निकालांनी येथील घराणेशाहीचा अंत झाल्याचे संकेत दिले आहेत. यंदा जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 35 वर्षांतील सर्वाधिक मतदान झाले होते.1989 मध्ये दहशतवादाचा उद्रेक झाल्यापासून मतदानाने विक्रम मोडला. काश्मीरमधील लोकसभेच्या तीन जागांसाठी मंगळवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू झाली. श्रीनगर, बारामुल्ला आणि अनंतनाग-राजौरी या तीन मतदारसंघांसाठी स्थापन करण्यात आलेल्या चार मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी झाली.
