राज्यावर पावसाचे ढग; ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. राज्यात मान्सूनसाठी पोषक अशा प्रकारची स्थिती निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मान्सून असल्याचा हवामान विभागाने दावा केला आहे. पावसासह आज राज्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळणार असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांना हायअलर्ट दिला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागात हवामान खात्याकडून आज यलो अलर्ट जारी करण्यात आा आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांनी पावसाच्या आधी सर्व कामे उरकून घ्यावीत, तसेत योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

५ जून ते ८ जून दरम्यान नाशिक, अहमदनगर, पुणे कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात आजपासून पुढील पाच दिवस औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक ४ ते ७ जून दरम्यान लातूर, दिनांक ४ ते ६ जून दरम्यान नांदेड, ५ जून दरम्यान जालना, परभणी या जिल्ह्यात व दिनांक ६ जून रोजी जालना, ५ जून रोजी हिंगोली येथे वीजांचा कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.