स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मुख्यमंत्र्यांकडून अनोखे नमन

विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या आत्मार्पण दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनोखे नमन केले आहे. वीर सावरकर यांनी मार्सेलिसला धैर्य वाढविण्यासाठी जे काव्य रचले, त्या ‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिला रिपु जगति असा कवण जन्मला’ या गीताला राज्य सरकारतर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार-2025’ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
( A unique tribute to freedom fighter Veer Savarkar from the Chief Minister Devendra Fadnavis)
पुरस्काराचे यंदाचे हे पहिले वर्ष असून, तो दरवर्षी दिला जाणार आहे. 2 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप राहणार आहे,
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा उद्या ( बुधवार)  आत्मार्पण दिन आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे नमन केले आहे.पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यातर्फे याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे की  मराठी अथवा मराठी बोलीभाषेमधून लिहिलेल्या व संगीतबद्ध झालेल्या एका प्रेरणा गीतास सन २०२५ सालाकरीता “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार” म्हणून प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहीलेल्या “अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिला रिपु जगति असा कवण जन्मला” या प्रेरणा गीतास “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार” सन २०२५ म्हणून या शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांच्या साम्राज्याला विरोध करत त्यांच्याविरुद्ध पुकारलेल्या बंडाचं प्रतीक म्हणजे सावरकरांची मार्सेलिस बंदरावर मारलेली उडी. त्यांच्या या उडीनंतर ते पकडले जरी गेले तरीदेखील शिक्षा झालेली असताना बोटीमधून उडी मारून मार्सेलिस बंदरापर्यंत पोहत जाण्याचा सावरकरांचा निर्णय हा क्रांतिकारी आणि धाडसीच होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्सेलिसला धैर्य वाढविण्यासाठी हे काव्य रचले
पूर्ण कविता 
अनादि मी अनंत मी अवध्य मी भला |
मारिल रिपु जगति असा कवण जन्मला ||ध्रु||
अट्टहास करित जाई धर्मधारणी
मृत्युसीच गाठ घालू मी घुसे रणी
अग्नि जाळी मजसी ना खड्ग छेदितो
भिउनी मला भ्याड मृत्यु पळत सुटतो
खुळा रिपु तया स्वये
मृत्युच्याच भीतीने भिववु मजसी ये ||१||
लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळी ज्वालांच्या फेकशी जरी
हटुनी भवति रचिल शीत सुप्रभावती
आण तुझ्या तोफाना क्रूर सैन्य ते
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते
हलाहला त्रिनेत्र तो
मी तुम्हासी तैसाची गिळुनी जिरवितो ||२||
या कवितेचा सारांश –
मला सुरुवात नाही, अंत नाही. मला मारले जाऊ शकत नाही. मला मारणारा शत्रू अजून जन्माला आलेला नाही. मी हट्टाने युद्धक्षेत्रात प्रवेश करीन. मृत्यूशी लढण्यासाठी मी युद्धक्षेत्रात उतरेन. आग मला जाळू शकत नाही, तलवार मला कापू शकत नाही. भ्याड मृत्यू माझ्या नजरेपासून पळून जातो. आणि हा मूर्ख शत्रू मृत्यूच्या भीतीने मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे !
जर तू मला भयंकर सिंहाच्या पिंजऱ्यात ढकललेस तर तो गुलामासारखा माझा पराक्रम पाहील. जर तुम्ही मला अग्नीच्या ज्वाळांमध्ये फेकले तर त्या स्वतःहून दूर जातील आणि शीतल तेज मला घेरून राहील. तुझे तोफगोळे, तुझे भयंकर सैन्य, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान किंवा आग फेकणारी शस्त्रे घेऊन ये – जसे त्रिनेत्र म्हणजेच (भगवान शिवाने) प्राणघातक विष हलाहलाला गिळून टाकले, त्याचप्रमाणे मी तुला गिळून टाकीन आणि तुझा अहंकार चिरडून टाकीन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *