विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले आहे. आपल्या विनंतीला मान देऊन नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभारी मानले आहेत. शरद पवार यांच्या त्या पत्रामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. ( Sharad Pawar expressed his gratitude, praising Prime Minister Narendra Modi)
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आल्याबद्दल आभार मानले आहे. तुमचे सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना खूप भावले असे गौरद्वगार पवार यांनी काढले आहे.
यापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला निमंत्रण देत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. त्यात दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थिती लावण्याची विनंती करण्यात आली होती. पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान हे साहित्य संमेलन दिल्लीत आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाची जगभर चर्चा झाली.
शरद पवारांनी या पत्रात म्हटले आहे की,
मी मनःपूर्वक आभारी आहे की आपण माझ्या विनंतीला मान देऊन २१ फेब्रुवारी २०२५ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यासाठी सहर्ष संमती दिली. सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या साहित्य संमेलनाला आपल्या मार्गदर्शनामुळे ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले. आपल्या विचारपूर्ण आणि प्रभावी भाषणाने संपूर्ण जगभरातील मराठी भाषिकांच्या हृदयात स्थान मिळवले. उद्घाटन सोहळ्यात आपण माझ्याविषयी दर्शविलेल्या विशेष आत्मीयतेबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो.
संमेलनाचे प्रमुख स्थळ तालकटोररा स्टेडियम ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. पेशवा बाजीराव पहिला, महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांनी येथे छावणी उभारली होती. या ऐतिहासिक ठिकाणी त्यांच्या स्मृतींच्या सन्मानार्थ सरहद, पुणे यांच्यातर्फे सुरुवातीला अर्धाकृती पुतळे उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. ,अनेक साहित्यिक आणि अभ्यासकांनी या थोर योद्ध्यांचे पूर्णाकृती अश्वारूढ पुतळे उभारावेत, अशी मागणी केली आहे, जे त्यांच्या पराक्रमाला अधिक योग्य श्रद्धांजली ठरेल. हे स्टेडियम नवी दिल्ली महानगरपालिकेच्या (NDMC) अखत्यारित येत असल्यामुळे, या स्मारकासाठी अधिकृत परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे दिल्ली सरकार आणि NDMC यांनी आवश्यक परवानगी द्यावी, याकरिता आपण स्वतः हस्तक्षेप करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनम्र विनंती आहे.
आपले नेतृत्व नेहमीच भारताच्या गौरवशाली इतिहासाचे संरक्षण आणि सन्मान करण्यास सक्षम ठरले आहे. त्यामुळे आपण या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करून आवश्यक निर्देश द्याल, अशी अपेक्षा आहे.आपल्या सहकार्याबद्दल मी पुन्हा एकदा आपला मनःपूर्वक आभारी आहे.
