विशेष प्रतिनिधी
पुणे : लोणावळ्यातील एका 23 वर्षीच्या तरुणीवर धावत्या कारमध्येसामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी ही स्थानिक रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बारा तासानंतर या प्रकरणातील एका आरोपीला लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (23-year-old woman gang-raped in a moving car in Lonavala)
धावत्या कारमध्ये तरुणीवर चालकासह तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना काल शनिवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी दुपारी गुन्हा दाखल केला. 23 वर्षीय तरुणीने याबबात फिर्याद नोंद केली आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुंगार्ली येथील नारायणीधाम मंदिरापासून तरुणी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पायी जात असताना कारमधून जाणाऱ्या तीन अनोळखी व्यक्तींनी तिला थांबवलं. तिच्यावर जबरदस्ती करत तोंड दाबून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं. त्या तिघांनी तिचे हात बांधून तिचा मोबाइल काढून घेतला. तिला मारहाण केली व तिच्यावर अत्याचार केला. नराधमांनी तिला निर्जन ठिकाणी रस्त्याच्या कडेला सोडून दिले. या सर्व प्रकारानंतर पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी केली व दुपारनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून, आणखीन दोन आरोपींचा शोध सुरु आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली.
