आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, दिव्य मंंदिरात राहतील – पंतप्रधान नरेंद्र मोदी

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा लोकार्पणाचा सोहळा आज पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन झालं. अतिशय भक्तिमय वातावरणात, दिग्गज महंतांच्या मंत्रोच्चारात, शंखनादात रामलल्ला मंदिरात विराजमान झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भावूक झालेले बघायला मिळाले. आता आमचा राम तंबूत नाही तर भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत, असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले. “या शुभ घडीच्या सर्व देशवासीयांना खूप शुभेच्छा. किती सारं सांगण्यासारखं आहे. पण कंठ नि:शब्द झालाय. माझं शरीर अजूनही स्तब्ध आहे. चित्त अजूनही त्या क्षणात लीन आहे. आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत. आमचे रामलल्ला आता दिव्य मंदिरात राहतील”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सियावर रामचंद्र की जय… असे म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. आज आपले राम आले आहेत. मला खूप काही बोलायचं आहे, पण कंठ दाठले आहेत. आजचा क्षण हा अलौकीक आणि पवित्र आहे. अनेक वर्षांच्या तपस्यानंतर प्रभू राम आले आहेत. आज मी प्रभू श्रीरामाची माफी मागत आहे. आपल्या त्यागात, तपस्यामध्ये काही कमी राहिले असेल, त्यामुळेच या कामाला इतके वर्षे लागली. आज ही कमी पूर्ण झाली आहे. मला विश्वास आहे, प्रभू श्रीराम नक्कीच माफ करतील. 22 जानेवारी 2024 ही फक्त कॅलेंडरवरील तारीख नाही. नव्या कालचक्राचा उगम आहे. आजची वेळ सामान्य नाही. हजारो वर्षानंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मागील 11 दिवसांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये रामायण ऐकलं, असेही मोदींनी सांगितलं.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आपल्या अनेक पिढ्यांनी जे धैर्य दाखवलं त्या धैर्याचा वारसा आज आपल्याला मिळाला आहे. गुलामीची मानसिकता तोडून आपण नवराष्ट्र निर्मिती करतो आहोत. अशाच प्रकारे नवा इतिहास लिहिला जातो. आजपासून एक हजार वर्षांनीही आजचीही तारीख लक्षात ठेवतील. ही रामाचीच कृपा आहे. आज आपण सगळे हा क्षण आपण जगतो आहोत, आपण पाहतो आहोत. आजचा दिवस, दिशा सगळं काही दिव्य झालं आहे. ही वेळ सामान्य नाही. कालचक्रावर केलेली स्मृतीची अमिट स्मृती आहे. आपल्याला सगळ्यांन ठाऊक आहे की रामाचं काम जिथे असतं तिथे पवनपुत्र हनुमानही विराजमान असतात. मी आज रामभक्त आणि हनुमानगढीलाही प्रणाम करतो.

पंतप्रधान मोदींनी मागितली प्रभू श्रीरामाची माफी
‘मी आज प्रभू श्रीरामांची क्षमा मागतो, आमचा पुरुषार्थ, आमचा त्याग, आमच्या तपश्चर्येत काहीतरी कमी राहिली असेल, आम्ही इतकी शतकं हे कार्य करू शकलो नाही. आज ही कमी पूर्ण झाली आहे. मला विश्वास आहे प्रभू राम आज आम्हाला निश्चित क्षमा करतील,’ असं म्हणत पंतप्रधानांनी प्रभू श्रीरामांची क्षमा मागितली. ‘रामकथा ही असिम आहे, रामायण अंतिम आहे. रामाचे मूल्य सगळीकडे एक समान आहे. आज या ऐतिहासिक क्षणामध्ये ज्या व्यक्तींची आठवण करत आहोत. आज आपण शुभ दिवस पाहत आहोत. त्याग आणि तपस्यामुळे हे साध्य झालं आहे. कारसेवकांचे आपण ऋणी आहोत’, असं पंतप्रधान म्हणाले.
‘आजचा दिवस विजयाचा नाही तर विनम्र होण्याचा आहे. जगात असे देश आहेत, ज्यांनी आपल्या इतिहासाची पान उघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अडचणी आल्या, पण आमच्या देशाने इतिहासाची ही गाठ उघडली, ती हे सांगते की आमचं भविष्य हे जास्त सुंदर असणार आहे’, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्त केला.