काळजीवाहू ताई ‘तेव्हा’ रस्त्यावर का उतरल्या नाहीत; रुपाली चाकणकर यांचा सुप्रिया सुळे यांना सवाल

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. तशी नोटीस त्यांना जारी करण्यात आली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी ही केंद्रीय यंत्रणा राहिली नाही तर ती भाजपची शाखा झाल्याची टीका केली. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी या कारवाईमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. रोहित पवार यांनी ईडी चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी आजोबा आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आत्या सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यावेळी सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. यावरून राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना थेट सवाल केला आहेत.

चाकणकर म्हणाल्या, आज रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात काळजीवाहू ताई रस्त्यावर उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. मला हा प्रश्न पडतो की, जेव्हा आदरणीय अजितदादांवर इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई आणि चौकश्या सुरू होत्या, त्यावेळेस अशा प्रकारचे मोर्चे का नाही काढले..?? किंवा अशा प्रकारे काळजीवाहू ताई रस्त्यावर का उतरल्या नाही..?, तुम्हाला दादांच्या पाठीशी उभे राहणं गरजेचे वाटले नाही का..?

“केवळ अजितदादाच नाहीत तर जयंत पाटील,अनिल देशमुख,छगन भुजबळ ,नवाब मलिक, प्राजक्त तनपुरे यांच्या वेळेसदेखील कधीही मोर्चे काढले नाहीत. पक्षासाठी नेहमी झटणाऱ्या या नेत्यांना अडचणीच्या काळात आधार द्यावा, असे तुम्हाला वाटले नाही का? अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतल्याची १०० खोटी कारणे तुम्ही देत असाल, परंतु तुम्ही तुमच्या स्वार्थापलीकडे पक्षातील कुणालाही कुटुंब म्हणून मानत नाही हे देखील तितकेच विदारक सत्य आहे”, अशी टीकाही रुपाली चाकणकर यांनी केली.