विविध सणानिमित्त रेशन दुकानातून ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. अयोध्या येथे राम मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ अल्पदरात देण्याचे जाहीर केले होते. शिवजयंतीनिमित्त वितरित करण्याचा ‘आनंदाचा शिधा’ सर्व रेशन दुकानात पोहोचला आहे. या रेशन दुकानात आता अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार दरवर्षी लाभार्थ्यांना एक साडी देण्यात येणार आहे. यंदा शिवजयंतीच्या निमित्ताने ही साडी मिळणार आहे.
‘आनंदाचा शिधा’ साखर, तेल, रवा, चनाडाळ, मैदा, कच्चे पोहे या सहा शिधा जिन्नसाचा समावेश आहे. अंत्योदय रेशनकार्ड धारक कुटुंबांना यंदा साडी देखील मिळणार आहे. नाशिक विभागासाठी सुमारे पाच लाख 81430 नग साड्यांचा साठा उपलब्ध झाला असून यात धुळे नंदुरबार जिल्ह्यासाठी सुमारे एक लाख 81 हजार 915 तर खानदेशासाठी एकूण तीन लाख 16 हजार 841 साड्यांचा साठा उपलब्ध झाला आहे. सहा मार्चपासून याचं जिल्ह्यात वाटप होणार आहे असे जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. नाशिक विभागाला पाच लाख 81,430 नग साड्या त्यात धुळे जिल्ह्यासाठी 75 हजार 738 तर नंदुरबार जिल्ह्यासाठी एक लाख सहा हजार 177 साड्या, जळगाव जिल्ह्यासाठी एक लाख 34 हजार 926 नाशिक जिल्ह्यासाठी 11752 तर नगर जिल्ह्यासाठी 88 हजार साड्यांचा समावेश आहे.
जे शिधापत्रिकाधारक अंत्योदय योजनेत समाविष्ट झाले आहे, त्यांना साडीचे पुरवठा विभागाकडून वितरण करण्यात येणार आहे.या योजनेतील धान्याचे वाटप हे ई-पॉस मशिनद्वारे करण्यात येते.त्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता येत आहे.त्याचा विचार करून साड्यांचेही वाटप पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी त्यांचे वाटपही आता ई-पॉस मशिनवरच करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
