रामजन्मभूमि आंदोलन आजतागायात झालेल्या सगळ्यात मोठ्या आंदोलनांपैकी एक आहे. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर ५ ऑगस्ट २०२० रोजी राममंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. आता या मंदिराच्या निर्माणासाठी जनसहभागातून निधीसंकलनाचा कार्यक्रम सुरु झालेला आहे, ज्यामध्ये अनेक हिंदु संघटनांचा सहभाग आहे. मात्र याबाबत आपलं वक्तव्य देत संजय राऊत म्हणतात, “निधी संकलन म्हणजे २०२४चा प्रचार” | रामजन्मभूमि आंदोलनात हिंदूसांठी मैदानात उतरलेल्या शिवसेनेचं हे रूप आज बाळासाहेब ठाकरेंना बघवलं असतं का ?
पहिले मंदिर झालं पाहिजे मग सरकारचा विचार करू म्हणणारी शिवसेना आज केवळ वोटबँकसाठी मंदिराच्या निधीसंकलनाबद्दल अपमानास्पद वक्तव्य देते ही शोकांतिका आहे. आठवून बघा १९९२चा तो काळ ज्यावेळी हिंदू मुस्लिम दंग्यांमध्ये अनेकांच्या कत्तली झाल्या. त्यावेळी हिंदुहृदयसम्राट म्हणून अनेक हिंदूंचा जीव वाचवणारी बाळासाहेबांची शिवसेना होती, मात्र आज, त्याच रामललासाठी ज्यावेळेला निधी संकलन केले जात आहे, तेव्हा या घटनेला ‘२०२४’ चा प्रचार म्हणून संजय राऊत यांनी न केवळ शिवसेनेचा किंबहुना अखंड हिंदूराष्ट्राचा देखील अपमान केला आहे. जी शिवसेना मुंबईत हिंदूचे रक्षण करण्यासाठी प्रसिद्ध होती, जी शिवसेना कोर्टात छातीठोकपणे रामजन्मभूमि आंदोलनात आपला सहभाग नोंदवत होती, जी शिवसेना हिंदूच्या रक्षणासाठी काहीही करायला तयार होती, आज तीच शिवसेना राममंदिरासाठी निधी संकलानाला २०२४ निवडणुकींचा प्रचार म्हणत अपमान करतेय, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
देशातील मागच्या पिढीने रामजन्मभूमि आंदोलन ‘याचि देही याचि डोळा’ बघितले आहे, त्यामध्ये अनेकांनी सहभाग देखील घेतला आहे, अनेक लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. कोठारी बंधूंची निर्दय कत्तल असू देत नाही तर इतर हृदय पिळवून टाकणाऱ्या घटना, या सर्व वीरांच्या बलिदानामुळेच आणि असंख्य हिंदू बांधवांच्या तपस्येमुळेट तब्बल २८ वर्षांच्या तपानंतर २०२० मध्ये रामजन्मभूमिचे भूमिपूजन झाले. आज वेळ आली आहे राम लला ला दिलेले वचन पूर्ण करण्याची. “राम लला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाएँगे,” असे म्हणणारे अनेक शिवसैनिक आज केवळ राऊत यांच्या एका वक्तव्यामुळे गप्प बसले आहेत.
बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कदाचित त्यांच्यासोबतच संपली आता उरली ती हिंदूंना फसवणारी, त्यांच्या भावनांशी खेळणारी, “फशिवसेना”. बाळासाहेब गेले, आणि हिंदूंचे रक्षण करणारी, अखंड हिंदू समाजाला एकत्र आणणारी, आणि हिंदूच्या अस्मितेसाठी काहीही करण्याची तयारी असणारी शिवसेना देखील त्यांच्यासोबतच संपली. हेच सत्य आहे.
