महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांनी आणखी किती झळ सोसायची ? निकामी सरकारला कधी पर्यंत सहन करायचे ?

महाराष्ट्रात केवळ नावाचे असलेले ‘महाविकास आघाडी सरकार’ सामान्य जनतेसाठी मात्र अतिशय त्रासदायक झाले आहे. केवळ कपटाने, सत्तेसाठी सत्तेवर आलेले सरकार सामान्य माणसाचा विचारच करत नाही का ? असा काहीसा प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेला सरकारच्या निर्णयांमुळे पडला आहे. महाराष्ट्रात उद्धव सरकारने सत्तेवर आल्यावर बीजबिल मध्ये सब्सिडी देण्याचे आश्वासन सामान्य जनतेला दिले होते, तसे काही तर झाले नाही, उलट अवाजवी वीजबिल येत असल्याने सध्या जनता परेशान आहे. आणि म्हणूनच नुकतेच सरकारच्या विरोधात वीजबिलाची होळी करत जनतेने आपला निषेध व्यक्त केला आहे.

याविषयी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी , “एकिकडे कोणत्याच घटकाला मदत नाही आणि दुसरीकडे अवाजवी वीजबिलांच्या माध्यमातून गरिबांचे आर्थिक शोषण होत आहे. सरकारने तत्काळ निर्णय घेऊन गरिबांना दिलासा द्यावा !” असे मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातल्या जनतेसमोर अनेक खूप महत्वाचे प्रश्न उपस्थित आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा कोरोना मुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाचा, कोरोनाच्या वाढत्या प्रभावाचा आणि रोजगाराचा आहे. सरकारने वेळीच या प्रश्नांकडे लक्ष देवून जनतेला दिलासा देणं अपेक्षित आहे, मात्र सरकार काय करतंय ? तर वीजबिल वाढ करत, अवाजवी वीजबिल देत जनतेच्या समस्यांमध्ये, प्रश्नांमध्ये वाढ करतंय. हे सामान्य माणसाने कुठवर सहन करायचं ?

सध्या महाराष्ट्राला मिळालेलं नेतृत्व खरंच सक्षम आहे का ? असा प्रश्न आज सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला आहे. कारण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हे महत्वाच्या प्रश्नांवर न बोलता, विरोधी पक्षाला नावे ठेवणे आणि अगदी सामान्य असे सल्ले जनतेला देण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या अर्थाने एका ‘अभ्यासू’ नेतृत्वाची आज गरज आहे, कारण महाराष्ट्र ज्या परिस्थितीत सध्या आहे, त्यातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी ‘महा विकास आघाडी’ नव्हे तर एक अशा खंबीर, स्थिर सरकारची आवश्यकता आहे, ज्याचा प्रमुख अभ्यास करून अशा प्रश्नांवर तोडगा काढू शकेल.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काही लोकांनी त्यांच्या ‘अभ्यासू’ वृत्तीवरून टोमणे मारले, मात्र आज त्याच अभ्यासू वृत्तीची महाराष्ट्राला आवश्यकता आहे, याबद्दल काहीच दुमत नाही.

आजही महाराष्ट्र कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पहिल्याच नंबर वर आहे. रुग्णांचे मृत्यु अजूनही होत आहेत. कोरोनामुळे पलायन करून गेलेले मजुर अजूनही गावी आहेत, त्यामुळे कंस्ट्रक्शन बिझनेस कोलमडला आहे. अनेक कामे थांबली आहेत, त्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि असे सगळे असताना अवाजवी वीज बिल आल्याने अनेक लोकांना त्याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय.

असे सर्व असताना मुख्यमंत्री ‘मी सर्व उघडतो, सुरु करतो, जबाबदारी तुम्ही घेता का ?” असा प्रश्न विचारून सामान्य जनतेचा अपमान करताएत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे आता सामान्य जनतेने काय करायचं ? याचं उत्तर सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *