महाराष्ट्रात कोणता प्रश्न अधिक मोठा कोरोना का कंगना ?

गेल्या एक आठवड्यापासून महाराष्ट्रात सरकारसाठी एक अतिशय महत्वाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. अगदी कोरोना पेक्षाही मोठा. तो म्हणजे कंगना रणौत यांचं आयुष्य. काल महाराष्ट्र सरकारची सूड भावना त्यांच्या कारवायांमधून दिसून आली. ज्याचा निषेध न्यायालयाने देखील केला. सरकारविरुद्ध बोलल्यानंतर अवैध बांधकामाची नोटिस देत कंगना रणौत विरोधात बीएमसीने कारवाई करत त्यांचे ऑफिस तोडण्यात आले, आणि आता महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगना रणौत यांचे काही ड्रग्स संबंधात कनेक्शन आहे का ? त्या अम्लीय पदार्थ घेत होत्या का ? याची तपासणी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे सरकारच्या या आतताईपणामुळे आज समाजमाध्यमांवर एकच प्रश्न निर्माण होत आहे, तो म्हणजे “महाराष्ट्र सरकार समोर सध्या कोणता प्रश्न मोठा आहे ? कोरोनाचा का कंगना चा ?

सध्याची आकडेवारी बघूयात, तर आता महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 9 लाख 67 हजारांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे जवळ जवळ १० लाख. अद्यापही तेथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात प्रशासनिक भोंगळ कारभाराला सामोरे जावे लागत आहे, अजूनही सरकारकडून म्हणावे तसे लक्ष दिले जात नाहीये, अद्यापही रुग्णांबद्दल त्यांच्या घरच्यांना माहिती नसणे, मृतदेह हरवणे असे सगळे प्रकार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये होत आहेत, कोरोनामुळे महाराष्ट्रात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत सरकारसाठी त्यांचा इगो महत्वाचा आहे का राज्याच्या जनतेचे मोठे मोठे प्रश्न ? हा प्रश्न इथे नक्कीच उपस्थित होतो.

विधानसभेच्या पावसाळी सत्रात माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कोरोना काळात सुरु असलेल्या सरकारच्या कामाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते, त्यावेळी महत्वाचा प्रश्न हा होता कि, महाराष्ट्रात केवळ मुंबई आणि पुणेच महत्वाचे आहेत का ? नाशिक, औरंगाबाद, नागपूर, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग याकडे सरकारचे लक्ष का नाही ? या प्रश्नाच्या खोलात गेल्यावर लक्षात येते, कि या टायर २ आणि ३ च्या शहरांमध्ये परिस्थिती खरच गंभीर आहे, नागरिकांसमोर आरोग्यासह रोजगार, शिक्षण, स्वच्छता असे सगळेच प्रश्न आहेत. मात्र राज्य सरकारसाठी कंगना रणौतचे घर पाडणे, त्यांच्या विरुद्ध बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकणे, एखाद्या वृत्त वाहिनीला बॅन करण्याचे आदेश देणे हे जास्त महत्वाचे आहे.

हे सरकार जनतेने निवडून दिलेले सरकार नाही तर हट्टाने राजकीय खेळी करत सत्तेवर आलेले सरकार आहे, त्यामुळे जनतेसाठी या सरकारच्या भावना आहेत का? का केवळ स्वार्थासाठी हा सगळा सत्तेचा खेळ सुरु आहे, असा प्रश्न महाराष्ट्राची जनता उपस्थित करते आहे. आज महाराष्ट्र कोरोनाच्या दृष्टीने पहिल्या दिवशी पासून सतत नंबर १ वर आहे, राज्याच्या जनतेची वाईट परिस्थिती आहे, जे काम सरकारने करणे अपेक्षित आहे, ते काम विरोधी पक्ष आणि विविध संस्था करताएत, कारण त्यांना जनतेची खरी काळजी आहे, असे असताना महाराष्ट्राच्या नजीकच्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे, याची चिंता आज सगळ्यांनाच सतावतेय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *