यंदा सरासरीच्या १०१ टक्के पाऊस होणार ? हवामान खात्याचा अंदाज


पाऊस म्हटलं कि आपोआपच मन टवटवीत होतं, आणि मनाला तरतरी येते. त्यातून मान्सून येणार असं म्हटलं कि शेतकऱ्यांसह आपण सामान्य नागरिक देखील पावसाची मजा घेण्यासाठी आणि पावसात ओले चिंब होण्यासाठी सज्ज होवून बसतो. त्यातून यावेळेला हवामान खात्याने असा अंदाज वर्तविला आहे कि यंदा सरासरीच्या १०१ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या सुधारित अहवालानुसार यंदा सरासरीच्या १०१ टक्के पाऊस होणार आहे. त्यामुळे बळीराजा निश्चितच आनंदी झाला आहे.

भारतीय हवामान खात्याने सुधारित मान्सुनचा अंदाज व्यक्त केला असून 2021 सालच्या या हंगामात 101 टक्के पावसाची सरासरी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच प्रशांत महासागरात या दरम्यान स्थिती स्थिर राहणार असून आयओडी म्हणजे इंडियन ओशियन डायपोल निगेटिव्ह राहणार आहे. भारतीय हवामान खात्याने एका वर्च्युअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिली.

गेल्या एप्रिलमध्ये हवामान खात्याने मान्सुनचा पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यामध्ये 98 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता या बाबत सुधारित अंदाज व्यक्त केला असून तो सरासरीच्या 101 टक्के असेल असं सांगण्यात येतंय. प्रशांत महासागरात ला-लिना स्थिती तयार झाल्याने त्याचा फायदा नैऋत्य मान्सुनला होणार आहे. त्यामुळे मान्सुनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नुकतेच तौक्ते चक्रीवादळ आणि येस चक्रीवादळ येऊन गेल्याने अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे, मात्र आता या मान्सूनमधील पाऊस शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येतो, का ही बातमी एका येणाऱ्या संकटाची चाहूल आहे हे मात्र काळच सांगू शकेल. तूर्तास यंदा पाऊस चांगला होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे.