
आराध्य दैवत रामाच्या नावावरुन पुन्हा एकदा राजकारण सुरु झालेले आहे. काँग्रेसचे नेते राशीद अल्वी यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेलं विधान वादात सापडलं आहे. “जय श्री रामची घोषणा देणारे सगळे मुनी नाहीत, तर राक्षस आहेत”, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद सुरू झाला असून भाजपाकडून यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेण्यात आला आहे. सलमान खुर्शीद आणि राशीद अल्वी यांच्या विधानांमुळे काँग्रेस पक्ष मात्र टीकेच्या केंद्रस्थानी आला आहे.
भाजपा नेते अमित मालवीय यांनी राशीद अल्वी यांच्या या विधानाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये राशीद अल्वी जय श्री रामची घोषणा करणाऱ्यांविषयी मत मांडताना दिसत आहेत. “जे जय श्रीरामची घोषणा देतात, ते सगळे मुनी नाहीत, तर राक्षस आहेत. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे”, असं राशीद अल्वी म्हणाले आहेत. अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल होऊ लागला आहे.
अमित मालवीय म्हणाले आहेत कि, रामभक्तांसाठी काँग्रेसच्या मनात किती विष भरलेले आहे हे आपण या व्हिडियोच्या माध्यमातून बघू शकता.
एकूणच हिंदुत्वाच्या विरोधात असलेला पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे, आणि काँग्रेसचे नेते त्यांच्या अशा विधानांतून या विचारावर शिक्कामोर्तब करत आहेत. हिंदुंच्या आणि खासकरून रामभक्तांच्या भावना या विधानामुळे दुखावल्या गेल्या आहेत, मात्र त्याविरोधात कुणीही आवाज उठवत नाही, ही एक शोकांतिका आहे.
