शतायुषी शिवऋषी अनंतात विलीन…! एक युगाचा अंत…!



आज पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासेहब पुरंदरे अनंतात विलीन झाले. आज एका युगाचा अंत झाला. शिवाजी महारांना पिढ्या पिढ्यांमध्ये जीवंत ठेवणारे, जाणता राजा, शिवकल्याण राजाच्या माध्यमातून नवीन पिढीला शिवकाळात घेऊन जाणारे बाबासेहब आज आपल्या सगळ्यांपासून लांब गेले, आणि संपूर्ण महाराष्ट्राला, भारत देशाला पोरकं करून गेले. संघ शाखेतील संस्काराने तयार झालेल्या या शिवशाहीरांनी,शिवचरित्र गंगा घराघरात पोचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत अपार कष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयोमानामुळे होणाऱ्या आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.



रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेबांचं निधन झालं. “आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील,” असं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.

जगभरात छत्रपति शिवाजी महाराजांना पोहचविणारे, त्यांना तुमच्या आमच्यात जीवंत ठेवणारे आणि शिवभक्त म्हणून आपलं सर्व आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करणारे बाबासाहेब पुन्हा होणे नाही. बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.