
“महाविकास आघाडीने नुसता पोरखेळ चावून ठेवला आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. महाविकास आघाडी ओबीसी समाजाला टोपी घालण्याचे काम करत आहे, ते त्यांनी करू नये.” असे धारदार वक्तव्य आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. विधानसभेत सुरु असलेल्या अर्थसंक्लपीय अधिवेशनात ते आज बोलत होते.
“राजकीय आरक्षणाचा कोणताही डेटा सरकारने सादर केला नाही. कोणतेही पुरावे नाही. एक आटपाडी करू शकते आणि राज्य सरकार नाही. किती थट्टा कराल ओबीसी समाजाची?” असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. “हा पक्षाचा मुद्दा नाही. आम्ही प्रत्येक वेळी सहकार्य करतो आहे. आरक्षण लागू होऊ नये, यासाठी कुणाचा दबाव आहे का? एकही निवडणूक आरक्षणाशिवाय होणार नाहीत, हे सुनिश्चित करा. राज्य मागासवर्ग आयोग ही कार्यकर्त्यांची सोय लावण्याची जागा नाही, तेथे तज्ञ असले पाहिजे.” असेही ते यावेळी म्हणाले.
“राज्य सरकारचं हसं झालं आहे. ओबीसी समाजासाठी एक पैशाचे काम देखील राज्य सरकारने केले नाही. सर्वोच्च न्यायालयाने इंटरिम रिपोर्ट देण्याची संधी दिली. मात्र तो रिपोर्ट म्हणजे एक थट्टा आहे. अंतरिम अहवाल कशाचा आधारावर तयार करण्यात आला ? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारल्यावर काय उत्तर द्यावं हे सरकारला माहीत नाही. हा अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता, असे सरकारतर्फे सांगण्यात आल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी “मुख्यमंत्र्यांना अहवाल दिल्याने तो खरा ठरतो का?” असा प्रश्न करत सराकारची कानउघडणी केली आहे. या अहवालात तारखा नाहीत, सह्या नाहीत. याठिकाणी हा पोरखेळ सुरु आहे.” असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.
एकूणच राज्य सरकार विरोधी पक्षाच्या हातात आयतं कोलित देत असल्याचे समोर येत आहे. आधी नवाब मलिक प्रकरण आणि आता ओबीसी आरक्षण. महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून आधी सर्वाधिक कोरोनारुग्ण आणि व्यवस्थेत काळाबाजार आणि दुर्लक्ष त्यानंतर मनसुख हिरने आणि एंटालिया प्रकरण, मग राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सचिन वाझे आणि भ्रष्टाचार प्रकरण आणि आता नवाब मलिक प्रकरण. हे सरकार केवळ अशा घटनांसाठीच प्रसिद्ध होत असल्याचे दिसून येत आहे, जे अतिशय दु:खद आहे.
मुळात जनतेने हे सरकार निवडूनच दिलेले नाही, त्यामुळे जनतेसाठी हे सरकार पुढे काही पावले उचलेल का ? ओबीसी समाजामध्ये निर्माण झालेल्या रागाविषयी हे सरकार काय करेल? हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.
