
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात रोज नवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्याचे माजी मुखमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरातच हल्लाबोल केला आहे. काल फडणवीस यांनी नवाब मलिक आणि सरकारविरोधात केलेल्या आरोपांचे जे पुरावे समोर आणले आहेत, त्यासंदर्भात त्यांच्या ‘सागर’ या बंगल्यावर त्यांची चौकशी करण्यात आली, यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले होते. आज विधानसभेत याविषयी चर्चा झाल्यावर फडणवीस म्हणाले कि, “या प्रकरणाला राजकारणाचे वळण लागते आहे, याची मला संपूर्ण कल्पना आहे, मात्र मी कोणालाच घाबरत नाही. माझ्या वडीलांनी कोणताही गुन्हा केला नसताना त्यांना २ वर्षे आणि माझ्या काकूला १८ महीने इंदिरा गांधींनी जेलमध्ये ठेवले, त्यामुळे आम्हाला जेलची भिती दाखवू नका, आम्ही जेल वगैरेला घाबरत नाही.
फडणवीस म्हणाले की, मला प्रश्नावली पाठवल्यानंतर मी लेखी उत्तर देत प्रश्नावलीची उत्तरं देणार असल्याचं सांगितलं होतं. प्रश्नावली मध्ये विचारले प्रश्न हे साक्षीदार म्हणून होते. काल विचारलेले प्रश्न हे आरोपी म्हणून होते. मला प्रश्न विचारला की, तुम्ही ऑफिशियल सिक्रेट अॅक्टचा भंग केला आहे असं तुम्हाला वाटत नाही का? असे प्रश्न साक्षीदाराला विचारतात का? ही प्रश्नावली जाणूनबुझून कुणीतरी बदलली असं फडणवीस म्हणाले.
व्हिसल ब्लोअर एक्टप्रमाणे मी सुरक्षित आहे. मी अतिशय जबाबदारीने वागलो. माझ्याकडे ट्रान्सस्क्रिप्ट होत्या. कुणाची ट्रान्सस्क्रिप्टमधून बदनामी होऊ शकते म्हणून मी त्या केंद्रीय गृहसचिवांना दिल्या. माझ्या कडच्या ट्रांस्क्रिप्ट तुमच्या मंत्र्यांनी प्रेसला दिल्या, असं फडणवीस म्हणाले.
“अकेला देवेंद्र क्या करेगा?” असे वक्तव्य सरकारमधील एका महत्वाच्या व्यक्तिने एकदा केले होते, मात्र त्याचे उत्तर त्यांना निश्चितच आता मिळाले असेल. गेल्या काही दिवसांमध्ये फडणवीस यांनी अतिशय स्फोटक अशा पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. त्यात त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत, तसेच त्यांच्याकडे सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात अनेक पुरावे असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता फडणवीस पुढे काय करणार ? याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.
