
“काही लोक नखं कापून शहीद होण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी काही लोक बोलत आहेत. मराठी माणसाच्या नावावर राज्य करायचे आणि मराठी माणसांनाच लुटायचे, हे आता चालणार नाही. कायदेशीर उत्तर देण्याऐवजी भावनात्मक उत्तरं देत बसण्यात अर्थ नसतो.” असे विधान करत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेला टोला हाणला. नुकतेच संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर फडणवीसांना माध्यमांनी प्रश्न विचारला त्यावेळी ते बोलत होते.
आज भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मोठी शोभायात्रा आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माध्यमांनी फडणवीसांशी संवाद साधला असताना ते बोलत होते.
“आमच्या नेत्यांच्या घरी घुसून त्यांच्यावर बेकायदेशीर नोटीसा लावल्या जातात, काही चूक नसताना तासंतास कार्यवाही करण्यात येते. मात्र तरी देखील आमचे उत्तर कधीच असे नव्हते. मात्र आम्ही सादर केलेले पुरावे तथ्याधारित आहेत.” असेही ते यावेळी म्हणाले.
“या सरकारने मराठी माणसाच्या नावावर राजकारण केले आणि आता ते मराठी माणसालाच लूटताएत.” असा आरोप फडणवीसांनी यावेळी केला.
आजच्या भाजपच्या वर्धापनदिनाविषयी बोलताना फडणवीस म्हणाले कि :
“आम्हाला अतिशय आनंद आहे कि आज स्थापना दिवसाचा कार्यक्रम आम्ही प्रत्येक शक्ति केंद्रामध्ये घेत आहोत. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला संबोधित केलं. समतेचा समरसतेचा संदेश दिला, गरीब कल्याणाचा संदेश दिला. ज्या परिवारवादी पार्ट्या आहेत त्यांनी लोकशाहीला कसं आव्हान दिलं आहे आणि त्यासाठी कसा संघर्ष करावा लागणार आहे, ते ही मोदी जींनी आम्हाला सांगितले आहे. आम्ही भाजपच्या माध्यमातून भारताची सेवा करण्यासाठी कटीबद्द असू.”
