
“आम्हाला भारताचे हित बघायचे आहे, अमेरिकेचे नाही. असे जेव्हा भारताचे परराष्ट्र मंत्री सांगतात तेव्हा तो नव्या भारताचा परिचय असतो. राष्ट्रवादाच्याच विचारांनीच भारत समोर जाईल आणि या प्रवासाचे उपकरण हे भारतीय जनता पार्टी असेल.” अशा भावना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. शांतनू गुप्ता लिखीत आणि मल्हार पांडे अनुवादित भाजपा : काल आज आणि उद्या या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.
“हे पुस्तक म्हणजे केवळ भाजपाचा इतिहास नाही, तर एका शाश्वत विचाराला अंमलात आणणार्या संघटनेचा विचार आहे. आमच्यावर आक्रमण करणार्या प्रत्येक आक्रमकाला हे माहिती होते, की भारताची संस्कृती एकदा ध्वस्त केली की राज्य करणे सोपे आहे. भारतीय समाजाचा तेजोभंग करण्याचा त्यांचा हेतू होता. तेच काम पुढे इंग्रजांनी केले. भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता ही सर्वांत जुनी आहे, हा शोध लागला आणि तो समाजापुढे आला. डीएनएची नवीन थेयरी समोर आली आणि सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे, हे सिद्ध झाले. आम्ही दुय्यम नाही, तर जगाला विचार देणारे आहोत.” अशा भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी सरकारवर निशाणा साधत फडणवीस म्हणाले कि, “आत्मतेजाने, आत्मभानाने भारलेला समाज निर्माण होण्याची आज गरजआहे. हिंदूत्त्व हे संकुचित नाही, तर ते व्यापक आहे. या संस्कृतीचा वाहक म्हणून भारतीय जनता पार्टी काम करते आहे. आमच्या रक्तात हिंदूत्त्व. त्यामुळे आम्हाला कोणतीही शाल पांघरण्याची गरज नाही.” हिंदुत्वाची शाल पांघण्याची गरज नाही या वाक्यातून फडणवीसांनी राजकीय परिस्थितीवर निशाणा साधला.
या कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. राम सातपुते, आ. प्रशांत परिचारक, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि इतरही नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
