कितीही अडचणी आल्यातरी मविआच्या भ्रष्टाचाराची पोल खोल आम्ही करणारच : फडणवीस



“आमच्या समोर कितीही अडचणी आल्या, कितीही दगफेक झाली तरी आम्ही थांबणार नाही. आम्ही या भ्रष्टाचारी महाविकास आघाडीची पोल खोल करणारच.” असे वक्तव्य  विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाद्वारा काढण्यात आलेल्या पोल खोल यात्रेवर दगडफेक करण्यात आली, त्यानिमित्ताने माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत फडणवीस बोलत होते.

“ज्या प्रकारे सरकारचा बुरखा फाटतोय, भ्रष्टाचाराची पोल खोल होतेय, त्यामुळे सरकार घाबरले आहे. पहिल्या सभेनंतर हे सगळे हादरले आहेत. त्यांनी काही केलं तरी आम्ही सरकराची पोल खोल करूनच राहू.” असे ठाम वक्तव्य फडणवीस यांनी यावेळी केले. महाविकास आघाडी सरकरावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप समोर आले आहेत. फडणवीस यांनी पेनड्राईव्ह पुढे करत सरकारच्या अनेक भ्रष्टाचारांचा लेखा जोखा यंत्रणेकडे सोपवला आहे, त्यामुळेच ही दगडफेक करण्यात आली आहे, असे भाजपचे मत आहे.



भारतीय जनता पक्षाने बीएमसीवर भ्रष्टाचाराचे आरोप करत, त्याविरोधात ही ‘पोल खोल’ यात्रा सुरु केली होती. त्यानंतर या यात्रेवर नुकतीच दगडफेक करण्यात आली. त्यावर उत्तर देत फडणवीस म्हणाले कि, “आम्हाला हे अपेक्षित होतंच.”

या यात्रेसाठी वापरण्यात येणाऱ्या रथाची अज्ञात लोकांकडून तोड फोड करण्यात आली, दगड फेकून रथाची काच फोडण्यात आली. त्याविरोधात भाजपने आपला निषेध व्यक्त केला आहे. आणि सरकार घाबरले आहे, असे सांगत त्यांनी काहीही केले तरी आम्ही थांबणार नाही, असे देखील स्पष्ट सांगितले आहे.

सरकारचा भ्रष्टाचार पुढे येणार का? आरोपी नेत्यांना शिक्षा होणार का? असे सगळे प्रश्न सामान्य माणसाला पडले आहेत. आणि या सगळ्यात सामान्य माणसाची हयगय होते आहे, त्याचे काय होणार असा देखील प्रश्न इथे निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पुढे काय होते, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.