मुंबई पोलिस सरकारच्या दबावाखाली येऊन आपले कर्तव्य विसरले : फडणवीस


महाराष्ट्राच्या राजकारणात दर दिवशी काही ना काही गोंधळ होतच असतो. त्यातून काल किरीट सोमैय्या यांच्यावर झालेल्या हल्यातून एकूणच महाराष्ट्राचे राजकारण पेटले आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर मोठे आरोप करत प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले कि, “ मुंबई येथे पोलिस आपले कर्तव्य विसरून केवळ सरकारच्या दबावात येऊन काम करत आहेत. किरीट सोमैय्या यांनी पोलिस स्टेशन येथे पूर्व सूचना देत जाऊन सांगितले कि, बाहेर लोकांचा घोळका आहे, आणि माझ्यावर हल्ला होवू शकतो. मात्र तरी सुद्धा पोलिसांनी त्यांना एक प्रकारे लोकांच्या हवाले केलं. पोलिसांच्या समोर एक मोठा दगड फेकण्यात येतो, किरीट सोमैय्या ज्यांना झेड प्लस सुरक्षा आहे, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातो, ही अतिशय भीषण परिस्थिती आहे.” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

या घटनेविरोधात आज विरोधीपक्षाने राज्याच्या गृहमंत्र्यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीचा बहिष्कार केला आहे. यावर पत्रकार परिषद घेत फडणवीस म्हणाले कि, “पहिल्यांदा महाराष्ट्रात हे दिसतं आहे, कि विरोधीपक्षाच्या लोकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पोलिसांच्या समोर दगडफेक होते, झेड प्लस सुरक्षेच्या माणसावर पोलिसांसमोर हल्ला होतो. भाजपच्या लोकांना टारगेट करून मारण्याचा प्रयत्न केला जातो, खोट्या तक्रारी केल्या जातात, खोट्या केसेस केल्या जातात. पोलिसांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आणि हे केवळ यामुळे कारण आम्ही सरकारच्या भ्रष्टाचाराची पोल खोल केली. यांना जर वाटत असेल, कि त्यांच्या अशा हल्ल्यांना घाबरून आम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराची पोल खोलणं बंद करू तर तसं होणार नाही.” असे ठामपणे फडणवीस यांनी सांगितले.



ज्या पोलिसांना आपले कर्तव्य माहित नाही, जे आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत सरकारची जी हुजुरी करत आहेत, त्या पोलिसांवर कारवाई ही झालीच पाहीजे. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

पालघर साधु हत्याकांडाला नुकतेच एक वर्ष झाले. त्यावेळी देखील पोलिसांनी सगळी संकंटं डोळ्यांसमोर बघत असून सुद्धा त्या साधुंना झुंडाच्या हवाले केलं, आणि मॉबलिंचींग मध्ये साधूंची हत्या झाली. किरीट सोमैय्या यांचे नशीब होते, त्यामुळे त्यांचा जीव वाचला मात्र एकप्रकारे पोलिसांनी झेड प्लस सुरक्षा असणाऱ्या किरीट सौमैय्या यांना असेच या हल्लेखोरांच्या हवाले कलं. हे अतिशय भयंकर आहे.

या संपूर्ण प्रकारात आता पुढे काय होतं. मुंबई पोलिसांवर काही कारवाई होते का? हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.