हनुमान चालीसा ही महाराष्ट्रात नाही म्हणायची, तर काय पाकिस्तानात म्हणायची? – फडणवीस

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यासोबत ज्या प्रकारे वर्तन करण्यात आलं ते अतिशय लज्जास्पद आहे. “त्यांनी केवळ मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठणाची मागणी केली होती. आता हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही म्हणायची तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची?” असा सवाल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



“खासदार नवनीत राणा यांच्यावर या प्रकरणामुळे राजद्रोहची कलम लावण्यात आली आहे. हनुमान चालीसा महाराष्ट्रात म्हणण्यावर जर राजद्रोह लावण्यात येत असेल, तर आम्ही तो रोज करू. असे म्हणत फडणवीस यांनी भर पत्रकार परिषदेत जोर जोरात हनुमान चालीसा म्हटली, आणि आमच्यावर देखील राजद्रोहाचा खटला दाखल करा, असे देखील ते यावेळी म्हणाले.”

नवनीत राणा यांना कस्टडीत असताना अतिशय हीन दर्जाची वागणूक देण्यात आली आहे. त्या दलित असल्याची जाणीव त्यांना करून देण्यात आली, त्यांना प्यायला पाणी देण्यात आले नाही, त्यांना नित्यक्रियेंसाठी जाऊ दिले गेले नाही. हे अतिशय भयंकर आहे.



सरकारला जर वाटत असेल तर कि आम्ही गुंडशाही आणि झुंडशाहीला घाबरत असू, तर त्यांनी लक्षात घ्यावे केरळ आणि बंगाल येथे आमच्या शेकडो कार्यकर्त्यांना मारून टाकण्यात आले तरी देखील आम्ही घाबरलो नाही. हे तर महाराष्ट्र आहे. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत, लोकशाहीनुसार आंदोलनं करत आहोत, मात्र आमच्या सोबत जर ठोकशाही केली तर उत्तरही तसेच मिळेल. कायदा आणि सुव्यस्था सुखरूप ठेवण्याचे काम सरकारचे आहे, ते सरकारने नीट करावे. असेही ते यावेळी म्हणाले.

एकूणच रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर केलेली कारवाई ही सूडबुद्धीतून करण्यात आली आहे, असे दिसून येत आहे. यामध्ये आता पुढे काय होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.