
महाविकास आघाडी सरकारने सामान्य जनतेचे हाल केले आहेत, राज्याच्या शेतकऱ्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. “आज राज्यात कांद्याचे प्रश्न आहे. ऊसाचे प्रश्न आहे, सोयाबीनचे प्रश्न आहे. पण महाविकास आघाडी मात्र काहीही निर्णय घ्यायला तयार नाही. असेही ते यावेळी म्हणाले. आज भारतीय जनतापक्षाच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्र सरकारने इंधन दरावर दिलासा दिल्यानंतर राज्य सरकारने काय केले? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करताना राज्याच्या वाट्याला धक्का लावला नाही, तर केंद्राच्या हिश्य्यातून 2.20 लाख कोटी रुपयांचा भार घेतला. आंतरराष्ट्रीय पातळीवर संकट असताना हा निर्णय नरेंद्र मोदीजी यांनी घेतला, तो केवळ सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी. असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांची प्रशंसा करत राज्य सरकारवर निशाणा साधला.
ओबीसी आरक्षणावर आपण सातत्याने संघर्ष करीत आहोत. डिसेंबर 19 ते मार्च 22 या काळात केवळ वेळकाढू धोरण राज्य सरकारने राबविले. जी कार्यपद्धती मध्यप्रदेश सरकारला कळविली, तीच महाराष्ट्र सरकारला सुद्धा वारंवार सांगितली. पण मध्यप्रदेश जे करू शकले, ते महाराष्ट्राने केले नाही. असेही ते यावेळी म्हणाले.
आज भाजपच्या केंद्र सरकारला, नरेंद्र मोदी सरकारला ८ वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. माझे कुटुंब, माझी जबाबदारी नाही, तर प्रत्येक व्यक्तीला आपले मानत त्यांनी सुशासनाचा आदर्श उभा केला. आज जगातील अनेक देश महागाईने त्रस्त असताना त्यावर उपाययोजना करणारा भारत हा देश आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
