अकाेला : विराेधक सात आठ वर्षे नुसते भेटतातच आहेत. समीकरणे तयार करत आहेत. पण माेदीजी लाेकांच्या मनात असल्याने काेणतीही समीकरणे चालणार नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. विरोधकांनी वारंवार भेटावे, एकमेंकांसाेबत जेवण करावे, गप्पा माराव्यात. पण त्यांना माेदीजींची रेषा पुसता येणार नाही, असेही ते म्हणाले.

अकाेला येथे पत्रकार परिषदेत फडणवीस बाेलत हाेते. नितीश कुमार आणि शरद पवार भेट घेणार या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, हे लाेक गेले सात-आठ वर्षे भेटतातच आहेत. इतके भेटले आणि समीकरणे तयार केली पण काही चालत नाहीत. कारण माेदीजी लाेकांच्या मनामध्ये आहेत. माेदीजींपेक्षा माेठी रेषा ओढूनच त्यांची रेषा लहान करता येते. परंतु, माेदीजींपेक्षा माेठी रेषा ओढण्याची शक्ती आणि क्षमता आता तरी काेणामध्ये नाही. तशी मानसिकताही नाही.
त्यामुळे यांचा प्रयत्न माेदीजींची रेषा कशी पुसता येईल एवढ्यापुरताच मर्यादित आहे. पण माेदीजींची रेषा पुसता येणार नाही. त्यामुळे त्यांनी वारंवार भेटावे, वेगवेगळ्या राज्यांत भेटावे, एकमेंकांसाेबत जेवण करावे, गप्पा माराव्यात.
