महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर मुख्ययुक्तीवाद 10 जानेवारीपासून होण्याची शक्यता…!

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील वाद गेल्या अनेक दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. शिवसेना नेमकी कुणाची ? सत्ता कुणाची ? यावर अनेक वाद आता पर्यंत उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेवर आले आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय वळण लागलं. मात्र आता या सत्तासंघर्षावर पुढे काय होणार याकडेच सगळ्यांचे डोळे लागले आहेत. तर याविषयी आता सर्वोच्च न्यायालयात मुख्ययुक्तीवाद 10 जानेवारीपासून होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.



यापूर्वी याप्रकरणाची सुनावणी 1 नोव्हेंबर रोजी पार पडली होती. त्यावेळी दोन्ही गटांनी कागदपत्रांचा गोषवारा द्या आणि दोन्ही बाजूंनी एकत्र बसून महत्त्वाचे मुद्दे ठरवा, अंस म्हणत न्यायालयानं दोन्ही पक्षकारांना 4 आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर याप्रकरणी 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणं अपेक्षित होतं, पण त्यावेळी सुनावणी होऊ शकत नव्हती. आता याप्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्या तारखांचा विचार सुरु आहे. 

पुढच्या वर्षी 10 जानेवारीपासून या प्रकरणाचा मुख्य युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण 13 डिसेंबरला केवळ अनौपचारिक निर्देशांसाठी ऐकलं जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. याच दिवशी 10 जानेवारी या तारखेवर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होतं? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.