चंद्रकांतदादा यांच्यावरील शाईफेक हल्यामागे बारामती कनेक्शन..

पुणे : पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्याचा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यापासून अनेक नेत्यांनी निषेध केला आहे. मात्र, आता या हल्ल्यामागील बारामती कनेक्शन समाेर आले आहे. पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यास 51 हजार रुपयांचे बक्षीस बारामती तालुक्यातील साेमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी जाहीर केले हाेते.



गायकवाड हे साेमेश्वर कारखान्यावर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमधून संचालक म्हणून निवडून आले आहेत. पाटील यांच्याविरुध्द त्यांनी माेर्चा काढला हाेता. यावेळी  जो कोणी चंद्रकांत पाटील यांना काळे फासण्याचे काम करेल त्याला 51 हजार रूपयांचे बक्षीस दिले जाईल, असे चिथावणीखोर भाषण साेशल मीडियावर व्हायरल केले हाेते.

चंद्रकांतदादांवर शाईफेक झाल्यावर गायकवाड यांनी पुन्हा एक व्हिडीओ जारी केला. त्यामध्ये गायकवाड म्हणाले, चंद्रकांत दादा यांच्या वक्तव्यानंतर जाे कोणी त्यांच्यावर शाईफेक करेल त्याला आम्ही 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊ. अक्षरश: आनंद हाेत आहे की, चार पाच तासांमध्येच पिंपरी चिंचवडचे समता सैनिक दलाचे मनाेज गरबडे यांनी हे 51 हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे. आम्ही आनंदाने सांगताेय की त्यांना हे पारिताेषिक राेख रक्कमेसह देणार आहाेत. त्यांचा बारामती तालुक्यातील साेमेश्वरनगर येथे सन्मान करणार आहाेत.

दरम्यान, बारामती पाेलीसांनी  चिथावणीखोर भाषण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘चंद्रकांतदादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतं, त्याचा निषेधच. पण म्हणून त्यांच्यावर केलेली शाईफेक योग्य नाही. थोर व्यक्तींच्या आपण आत्मसात केलेल्या विचाराच्या विरोधात एक विचार अनेक वर्षांपासून काम करत आहे, त्याचा विरोध हा आपण सर्वांनी वैचारिक आणि संवैधानिक मार्गानेच करणं गरजेचं आहे’, असं ट्विट रोहित पवार यांनी शाईफेकीच्या घटनेनंतर केले हाेते. त्यावर पाटील म्हणाले, नामांतरांच्या चळवळीत मी होतो, तेव्हा रोहित पवार,राऊत कुठे होते? माझ्या विधानाचा आशय समजून घ्या. मी संघर्ष केला तेव्हा राेहित पवार काेठे हाेते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचा आणि मग बोला. एका गिरणी कामगाराचा मुलगा यांना आव्हान देताे ते रुचत नाही.