उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

केंद्रीय अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत मांडला. या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. राज्य सरकारने ही या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत आजचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. विकसित राष्ट्राकडे जाण्याच्या मार्गातील महत्वाचा दुवा हा यंदाचा अर्थसंकल्प आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. आजच्या अर्थसंकल्पावर काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणतही बजेट सादर झालं की काँग्रेसची प्रतिक्रिया ठरलेली असते. त्यामुळे त्यांच्या टीकेवर बोलण्यात काहीही अर्थ नाही, असंही फडणवीस म्हणालेत.

फडणवीस म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे मी आभार मानतो. कारण त्यांनी नुकताच सादर केलेला अर्थसंकल्प हा अमृतकाळातील सर्वजणहिताय असा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात जे लोक विकासात मागे आहेत, आपले तरुण आहेत, शेतकरी, छोटे उद्योग, मध्यमवर्गीय या सर्वांना लक्षात घेता या अर्थसंकल्पाची रचना करण्यात आली आहे.