नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सत्यजित तांबे आणि शुंभागी पाटील यांच्यात थेट लढत झाली असून निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे अनेकांचे लक्ष आहे. मात्र सत्यजित तांबे यांना निवडणुकीच्या निकालाआधीच एक धक्का बसला आहे. तांबे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि नाशिक पदवीधर निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळणारे नाशिक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे काल रात्री अपघाती निधन झाले आहे. सत्यजित तांबे यांनी स्वतः ट्विट करत आपल्या जवळच्या सहकाऱ्यांला श्रद्धांजली व्यक्त केली आहे. तर फेसबुक, ट्विटरवर अनेकजण मानस पगारच्या अपघाती निधनाबाबत दुःख व्यक्त करत आहेत.
मानस पगार हे युवक काँग्रेसमधील चर्चेतला चेहरा म्हणून ओळखले जायचे. तसेच सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तीय मानले जात होते.काँग्रेसची भूमिका सोशल मीडियावर अत्यंत आक्रमकपणे मांडत. त्यामुळे पक्षानेही त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या निधनानंतर सत्यजीत तांबे यांनी शोक व्यक्त केला आहे.
“भावपूर्ण श्रद्धांजली. माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे”, या शब्दात सत्यजीत तांबे यांनी शोक व्यक्त केला आहे.
