मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारं ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असेल.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तब्बल ६२ वर्षांनंतर महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळालं आहे. महाराष्ट्राची महती सांगणारं आणि मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारं ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असेल.
‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचं दुसरं आणि तिसरं कडवं राज्य गीत म्हणून गायलं जाणार आहे. वेळेचा विचार करता गीत मोठं होत असल्यानं निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयाच्या समोर राज्य गीताचा बोर्डही लावण्यात येणार आहे. एक मिनिट 45 सेकंदाचे हे राज्य गीत असणार आहेत. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या मराठी माणसांच्या अभिमानगीताला आता महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांच्या सांस्कृतिक कार्य विभागानं जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्रगीताला राज्यगीताचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून हा निर्णय अंमलात येणार आहे.
‘महाराष्ट्र गीत’ अशी ओळख असलेलं जय जय महाराष्ट्र माझा… हे गीत प्रसिद्ध कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आहे. श्रीनिवास खळे यांनी हे गीत संगीतबद्ध केलं असून कृष्णराव ऊर्फ शाहीर साबळे यांनी आपल्या खड्या आवाजात हे गीत गायलं आहे. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक गीत असावं, असा ठराव करण्यात आला होता. त्यासाठी महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड झाली
