मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा विजय झाल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ताबेंना निवडून देण्यासाठी राष्ट्रवादीने मदत केली असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांवर केला आहे. अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे हा आरोप मान्य केला आहे.
अजित पवार पुण्यात बोलताना म्हणाले, मविआतल्याही काहींनी सत्यजीतला मदत केली. त्या मतदारसंघात त्याला एवढी मतं मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील इतरांनीही त्याला मदत केलेली दिसते. त्याचे निवडणुकीचे आडाखे आणि मविआतल्या लोकांनी, मतदारांनी त्याला दिलेली साथ यामुळेच एवढं दैदिप्यमान यश मिळालं आहे. त्याचं घराणं काँग्रेसच्या विचारधारेशी निगडित असल्यामुळे मधल्या दीड महिन्यात काय झालं हे त्यानं जास्त मनाला लावून घेऊ नये. इतके दिवस चेंडू काँग्रेसच्या कोर्टात होता. सत्यजीत निवडून आल्यानंतर काँग्रेस, भाजपा त्यांच्या त्यांच्या पक्षाकडे त्याला बोलवायचा प्रयत्न करणार. सत्यजीतला पुढे त्याचं राजकीय भवितव्य आहे. त्याला बरीच वर्षं राज्याच्या राजकारणात काम करायचंय. या सगळ्याचा विचार करून त्यानं निर्णय घ्यावा.
पवारांनी तांबे यांना पुन्हा काँग्रेसमध्ये यावे असे म्हटले असले तरी नाना पटोले तांबे काँग्रेसपासून जास्तीत जास्त दूर कसे जातील यासाठीच प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नेतेही पटोले यांच्यावर नाराज आहेत. सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनी तर काँग्रेसमध्ये पुन्हा जाऊ नये अशी थेट विनंती केली आहे.
