मुंबई : अंधेरी पोट निवडणुकी वेळी भाजपला नैतिकतेचे धडे देणारे, महाराष्ट्राच्या परंपरेचा दाखला देणारे महाविकास आघाडीतील तीनही पक्ष कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या जागेसाठी एकमेकांचे लचके तोडताना दिसत आहेत. आता कुठं गेली बिनविरोध करण्याची परंपरा ? असा सवाल भारतीय जनता पक्षाने केला आहे.
अंधेरी पाेटनिवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वाे शरद पवार यांनी निवडणुक बिनविरोध व्हावी असे आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात इतर पक्षांनी उमेदवार देऊ नये. महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे अशी माझी इच्छा आहे. दीड वर्षांच्या कालावधीसाठी राजकारण नको असेही शरद पवार म्हणाले हाेते. मग हेच उदाहरण ते कसबा आणि चिंचवड विधानसभा पाेटनिवडणुकीच्या वेळी त्यांचे पुतणे अजित पवार तसेच काॅंग्रेस आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या नेत्यांना का देत नाहीत? असा सवाल केला जात आहे.
कसबा मतदारसंघ पाेटनिवडणुकीसाठी काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटानेही मागणी केली आहे. काॅंग्रेसने तर आपला उमेदवार आजच घाेषित करणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर शिवसेनेच्या नेत्या डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी आम्हाला गृहित धरू नका असा इशारा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारीवरून तीनही पक्षांनी एकमेकांचे लचके ताेडायला सुरूवात केली आहे.
