शिवसेनेत बंड होणार हे शरद पवार यांना माहीत होतं – अजित पवार

गेल्यावर्षी शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं. एक दोन नव्हे तर 40 आमदारांनी आणि इतर दहा समर्थक आमदार अशा 50 आमदारांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झिडकारून एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. शिंदे गटाने नंतर राज्यात सत्ताही स्थापन केली. शिवसेनेच्या या बंडावर राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेनेत बंड होणार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माहीत होतं. त्याबाबतची माहिती त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली होती असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. तसेच गफलत कुठे झाली याची माहितीही दिली आहे.

अजित पवार म्हणाले की आमदार फुटणार असल्याची महिती उद्धव ठाकरेंना दोन, तीन वेळा दिली होती शरद पवार साहेबांनी फोन करुन उद्धव ठाकरेंसोबत मीटिंग केली होती. पण माझ्या आमदारावर माझा विश्वास आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण स्वत: पक्ष नेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकला.तिथेच खरी गफलत झाली. शिवसेनेत बंड होणार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माहीत होतं. त्याबाबतची माहिती त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली होती.असे अजित पवार म्हणाले.

मात्र उद्धव ठाकरेंचा हाच विश्वास त्यांच्यासाठी घातक ठरला. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आमदारांशीही चर्चा केली होती. ते त्यांच्या परीने काम करत होते. दुर्दैवाने त्यांना यश आलं नाही. कदाचित त्यांना कधी वाटलं नसेल की इतकी टोकाची भूमिका त्यांची सहकारी घेतील असं अजित पवार म्हणाले.