मुंबई : सत्यजित तांबे प्रकरणावरून काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या अजित पवार यांनी निष्क्रियतेवरून उध्दव ठाकरे यांनाही डिवचले आहे. सत्तांतराबाबत गाैप्यस्फाेट करताना उध्दव ठाकरे यांना बंडखाेरीची माहिती दिली हाेती असा दावा केला आहे. मुभा असल्यासारखे आमदारांना जाऊ दिले असा आरोपही त्यांनी उध्दव ठाकरेंवर केला. पुण्यातील एका कार्यक्रमात बाेलताना अजित पवार म्हणाले, आमदार फुटणार ही महिती उद्धव ठाकरेंना दोन, तीन वेळा दिली होती. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही फोन करुन बैठक घेतली होती. पण ‘माझ्या आमदारावर माझा विश्वास आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण स्वत: पक्षनेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकला तिथेच खरी गफलत झाली.
या सगळ्या गोष्टी घडून दिल्या गेल्या आहेत, असा उध्दव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे आराेप करताना अजित पवार म्हणाले, आमदारांना खुशाल जाऊ दिलं गेलं. तिकडे हे व्हायला नको होतं. मी स्वतः उद्धवजींना सावध केलं होतं. पण ते बोलले की मी बोलेन, एकनाथ शिंदे यांच्याशी. तो आमचा पक्षांतर्गंत मामला आहे, असं उत्तर त्यांनी दिलं, त्यापुढे जाऊन अजित पवार म्हणाले, पहिला पंधरा- साेळा आमदारांचा ग्रुप गेल्यावर इतरांची एकजूट ठेवण्यासाठी जे करण्याची गरज हाेती तशा प्रकारची गरज दाखविली गेली नाही. मुभा असल्यासारखे काेणाला काेठे जायचे आहे तिकडे जावा, ज्यांना इकडे थांबायचे त्यांनी येथे थांबा अशा प्रकारचे वातावरण पाहायला मिळाले. त्यामध्ये काही जण गाफील राहिले असे म्हणायला हरकत नाही.
