पुणे : राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच गेले असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. चव्हाण यांना आमच्यापेक्षा आमचे विरोधक जवळचे वाटत होते असेही ते म्हणाले. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी 2014 मधील पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभाराच्या आठवणी जागवल्या. पवार म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी कधी आमदार म्हणून हे काम केले नव्हते. त्यामुळे आम्ही विरोधात असताना त्या वेळेच्या सत्ताधाऱ्यांनी आम्हाला कशी वागणूक दिली हे त्यांना माहित नव्हतं. त्यांना आमदारकीचा अजिबात अनुभव नव्हता.
मंत्रिमंडळात काम करण्याचा अजिबात अनुभव नव्हता. दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयाचे कामकाज ते पहायचे. दिल्लीच्या राजकारणामध्ये आणि राज्याच्या राजकारणामध्ये खूप अंतर असतं. दुर्दैवाने त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना काही असे प्रसंग निर्माण झाले ती एकमेकांना साथ देण्याऐवजी त्यावेळच्या काही लोकांना आमचे विरोधक जवळचे वाटले. तो फटका नंतर सरकार पडायला झाला.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना पवार म्हणाले, उद्धव ठाकरे काम करताना नेहमी सगळ्यांची चर्चा करायची. ते कुठलीही गोष्ट फार ताणून धरायचे नाहीत. मात्र गोष्ट त्यांना करायची असेल तर ते सांगायचे ही गोष्ट मी करणारच आहे. तुम्ही सगळ्यांनी त्यासाठी मानसिकता तयार करा. त्यातून आपल्याला पुढे जायचे आहे. उदाहरणार्थ औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करायचा विषय शेवटच्या कॅबिनेटमध्ये आला होता. उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा विषयही आला होता. काही जणांची वेगवेगळी मते असू शकतात. पण त्यांनी सांगितल्यावर कॅबिनेटने त्यांच्या मताचा आदर केला.
मी काही त्यांचे वकीलपत्र घेतले नाही. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे पण जनतेच्या मनात उद्धव ठाकरे साहेबांच्या बद्दल सहानुभूती दिसते. ज्या पद्धतीने अडीच वर्ष कारभार करत असताना त्यांना बाजूला करून, त्यांच्या आमदारांची फोडाफोडी करून गलिच्छ राजकारण महाराष्ट्रामध्ये करण्याचे पाप ज्यांनी कोणी केले त्यांना महाराष्ट्रातील जनता उघड बोलून दाखवत नाही, पण मनामध्ये ठेवेल. पण बटन दाबताना बरोबर तेथे जाऊन बटन दाबतील.
