गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोट निवडणूकीच्या उमेदवारीवरुन चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. सत्ताधारी तसेच महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू होती. आता भाजपाने या दोन्ही निवडणुकांसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजप नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या जागेसाठी हेमंत रासणे यांच्या नावाची घोषणा भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. तर भाजप नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही पोटनिवडणूक होतेय. याठिकाणी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागच्या काही दिवसापासून या दोन मतदारसंघात भाजप कुणाला उमेदवारी देणार याबाबत चर्चा होत होती. बऱ्याच तर्क-वितर्कांनंतर अखेर आज उमेदवारीची घोषणा भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
दोन्ही मतदार संघात इच्छूकांची मोठी यादी होती. नेमकी भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. त्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. या सगळ्या चर्चांवर पडदा पडला आहे.
