आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. पालिकेवर प्रशासक असल्यानं आयुक्तच प्रशासक म्हणून यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे शिक्षण खात्याचं बजेट आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांना सादर करतील. तर अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू पालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर करतील. तर सकाळली 11.30 वाजता पालिका मुख्यालयात आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांची पत्रकार परिषद होईल.
देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेच्या अर्थसंकल्पातून सर्व सोयी सुविधा मिळाव्यात, अशीच मुंबईकरांची अपेक्षा आहे. दरम्यान, गेल्यावर्षी ४५ कोटी ९४९ कोटींची अर्थसंकल्प सादर करण्यात आले होते. त्यावेळी बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकं कोणत्या गोष्टींवर भर दिला जाऊ शकतो? मुंबईकरांना काय हवंय? काय द्यायला हवं?यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्तांना विशेष सूचना केल्या आहेत.
मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पाचं आकारमान 50 हजार कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. यावर्षी पालिकेची आणि नगरसेवकांची मुदत संपलेली असल्यामुळे तसेच निवडणूक अजून झालेली नसल्याने अर्थसंकल्प प्रशासकीय पातळीवरच जाहीर होईल. यावर्षी अतिरिक्त मनपा आयुक्त अश्विनी भिडे या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प प्रशासक इकबालसिंह चहल यांना सादर करतील.
