नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा मोठ्या मताने दणदणीत विजय झाला आहे. या विजयानंतर लवकरच मी राजकीय भूमिका स्पष्ट करेन अशी पहिली प्रतिक्रिया सत्यजित तांबे यांनी दिली. आज त्यांची भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. काँग्रेसशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आता नेमकी सत्यजीत तांबे पुढे काय भूमिका घेणार?याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांना राजकीय भूमिका मांडण्यासाठी योग्य वेळ आल्याचे बोललं जात आहे. सत्यजित तांबे यांनीही यासाठी स्थळ आणि वेळ ठरवली आहे.सत्यजित तांबे हे पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे. आगामी काळात कोणत्या पक्षाचा हात धरणार याकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागून आहे.सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनी नाशिकमध्ये बोलत असतांना सत्यजित तांबे यांनी अपक्षच राहावं असा सल्ला दिला होता तर दुसरिकडे अजित पवार यांनी कॉंग्रेसचे सहयोगी राहावे असा सल्ला दिला होता.सत्यजित तांबे यांना स्थानिक पातळीवर भाजपने मदत केली हे उघड होते. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या राजकीय करकीर्दीची सुरुवात भाजपच्या मदतीने झाल्याचे बोललं जात आहे.
अशा अनेक घडामोडी घडवणारी नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणुक पार पडली आहे. सत्यजीत तांबे यांची पुढची भूमिका काय हे अद्याप स्पष्ट नाही. आधी निलंबन केले आणि आता विजय झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षात सन्मानाने घेण्याचा निर्णय घेतला तरी सत्यजित जाणार का? सत्यजित काँग्रेसमध्ये गेले तर त्यांच्या विजयात मोठा वाटा उचलणाऱ्या भाजपची भूमिका काय राहणार हा पेच कायम असल्यानं वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारून काही कालावधीसाठी अपक्षच राहणे सत्यजीत तांबे पसंत करणार का हे बघणं महत्वाचे आहे.
