महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनच्या मार्गात अडथळे आणले होते, त्यांनी या प्रकल्पासंदर्भात एकही परवानगी दिली नाही. आता गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही बुलेट ट्रेनचे काम धडाक्यात होईल, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.बुलेट ट्रेन प्रकल्पाने आता वेग घेतला असून शिंदे-फडणवीस सरकारने आवश्यक सर्व परवानग्या दिल्या आहेत, निविदाही काढल्या गेल्या आहेत. त्यामुळे मुंबई ते वापी या मार्गावर खांब उभारणीची कामे सुरू होतील तसेच गुजरातमध्ये 140 किमीच्या पट्टय़ामध्ये खांब उभारणी झालेली आहे. जपानने अलिकडेच बुलेट ट्रेनच्या कामांचा आढावा घेतला आहे, असे वैष्णव म्हणाले. बुलेट ट्रेन प्रकल्प ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी 13 हजार 539 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. राज्यातील 123 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येईल. यासह ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे जमीन अधिग्रहणाच्या आवश्यक मंजुरीचे काम पूर्णत्वास गेले, असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज येथे दिली.
येत्या दहा फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सोलापूर आणि शिर्डी अशा दोन वंदेभारतचा शुभारंभ होणार आहे. राज्यातल्या राज्यातच चालणाऱ्या दोन वंदेभारत मिळणारे महाराष्ट्र हे पहीलेच राज्य ठरणार आहे. कारण आता पर्यंत देशातील इतर राज्यात सुरू झालेल्या वंदेभारत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणाऱ्या आहेत. महाराष्ट्रात मात्र राज्यातल्या एका शहरातून दुसऱ्या शहरात वंदे भारत धावणार आहे.
महाराष्ट्रातील 123 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाईल. याअंतर्गत निवड केलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये मुलभूत तसेच अद्ययावत सुविधा पुरविण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या कंत्राटाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होऊन त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी माहिती मंत्री वैष्णव यांनी दिली.
बुलेट ट्रेनसाठी 19,000 कोटी रुपये
अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेच्या कामांसाठी 2023-24 या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात 19 हजार 592 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात बुलेट ट्रेनसाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यावेळी निधीत मोठी वाढ केली आहे. पहिल्या टप्प्यात सुरत – बिलिमोरा मार्गावर 2026 किंवा 2027 मध्ये पहिली बुलेट ट्रेन चालवण्याचे उदि्दष्ट आहे.
