मुंबईकरांना भेट, महापालिकेचा 52 हजार 553 कोटींचा अर्थसंकल्प

मुंबई : मुंबई महापालिकेचा 52 हजार 553 कोटींचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासातला हा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. 2022-23 साली 45,949 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा भांडवली खर्च हा महसूल खर्चापेक्षा अधिक आहे. रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, पूल, सागरी किनारा रस्ता प्रकल्प, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, मलनि:सारण प्रक्रीया केंद्र, पाणी पुरवठा प्रकल्प अशा बर्‍याच भांडवली प्रकल्पांवरील खर्च महापालिकेने तयार केलेल्या निधीतून करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या मुद्दे :
सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून internal temporary transfer मधून निधी उभा केला जाईल. 51147 कोटींच्या मुदत ठेवींमधून तो उभा केला जाण्याची शक्यता आहे. मुंबईचे सौंदर्य वाढवण्यासाठी 1729 कोटींची विकास कामे हाती घेतली आहेत.
दहिसर टोल नाका, मुलुंड चेकनाका, मानखुर्द, कलानगर जंक्शन, हाजीअली जंक्शन या 5 ठिकाणी हवा शुद्धिकरण यंत्रं बसवली जाणार.
बेस्ट उपक्रमास 2022-23 मध्ये 1382 कोटी रूपये देण्यात आले होते. 2023-24 मध्ये बेस्ट उपक्रमासाठी 800 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

31 मार्च 2023 पर्यंत 18 अतिरिक्त पॉलीक्लिनिक, डायग्नॉस्टिकक सेंटर्स आणि 131 हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू करण्याचे नियोजिले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उच्च रक्तदाब, मधुमेह, आणि इतर असंसर्गजन्य रोगांना तोंड देण्यासाठी ‘आरोग्यम् कुटुंबम्’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे.

आगामी शैक्षणिक वर्षांपासून, इलेक्ट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, फॅशन डिझायनिंग, कोडींग, रोबोटिक्स, tourism & hospitality, हे अभ्यासक्रम राबवले जातील. 249 माध्यमिक शाळांमध्ये हे प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित आहे. 9 मीटर पेक्षा जास्त रूंदीच्या सर्व प्रमुख रस्त्यांसाठी फूटपाथ केले जातील. जेथे सुस्थितीत फूटपाथ नाहीत ते सुलभ केले जातील.

मुंबईच्या खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेला रस्त्यांवरची बांधकामाची धूळ, वाहतूक कोंडी, उद्योग, ऊर्जा क्षेत्र, कचरा जाळणे हे चार घटक कारणीभूत आहेत. मुंबईतली ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई स्वच्छ हवा उपक्रमाअंतर्गत सात योजनांची घोषणा करण्यात येत आहे.