नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात लोकप्रिय आणि करिष्माई नेते आहेतच; पण आता जागतिक नेत्यांमध्येही जगात सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या ताज्या सर्वेक्षणानुसार जगातील 22 बड्या देशांतील नेत्यांमध्ये लोकप्रियतेत मोदी अव्वल आहेत. जगभरातील बहुतांश देशांमध्ये मोदींची लोकप्रियता वाढली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक या लोकप्रिय नेत्यांना मागे टाकून पंतप्रधान मोदी हे सर्वात लोकप्रिय जागतिक नेते म्हणून उदयास आले आहेत. मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 78% लोकप्रियता रेटिंगसह अव्वल आहेत. त्यांच्या पाठोपाठ मेक्सिकोचे अध्यक्ष लोपेझ ओब्राडोर यांनी 68% च्या मान्यता रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी लोकप्रियतेच्या 58% रेटिंगसह तिसरे स्थान मिळवले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या यादीत 52 टक्के रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहेत. ब्राझीलचे राष्ट्रपती लुला डी सिल्वा 50 टक्के मान्यता रेटिंगसह यादीत 5 व्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे 40% च्या समान रेटिंगसह सहाव्या आणि सातव्या स्थानावर होते. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक 30% लोकप्रियता रेटिंगसह 16 व्या स्थानावर आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे 29% रेटिंगसह 17 व्या स्थानावर आहेत. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोरे यांनी २१% लोकप्रियतेसह २२ वे स्थान मिळवले आहे.
कोरोनाच्या काळापासूनच जगातील सगळ्याच देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत आहे. याचे कारण म्हणजे कोरोनाच्या काळात देशपातळीवर महामारीचा यशस्वीपणे मुकाबला करत असतानाच अनेक देशांना भारताने औषधे आणि इतर गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या वेळीही मोदी यांनी मांडलेल्या भूमिकेचे कौतुक झाले होते.
