राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीला पत्र ; कसबा , चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी

राज ठाकरे यांनीही फेसबुक पोस्ट लिहून कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन केलंय. जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय. दरम्यान भाजपच्या बिनविरोधाच्या भूमिकेसाठी एकनाथ शिंदेंनीही प्रयत्न सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी केलेलं आवाहन लक्षवेधी ठरलंय.

राज ठाकरे म्हणाले, अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उमदेपणा भाजपने दाखवला आहे. आता कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीने उमदेपणा दाखवावा. महाराष्ट्र विधानसभेच्या दोन आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणुका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वांना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा.