नाना पटोलेंसोबत काम करणे अशक्य ; बाळासाहेब थोरात यांची थेट हायकमांडकडे तक्रार?

काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरच थेट आरोप केले आहेत. तांबे यांनी एबी फॉर्म वाटपाच्या घोळावरून नाना पटोले यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यामुळे नाना पटोले हे अडचणीत सापडले आहेत. सत्यजित तांबे यांचा हा हल्ला ताजा असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पटोले यांना घेरलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी थेट हायकमांडकडे पटोले यांची तक्रार केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. नाना पटोले यांच्यासोबत काम करणं अशक्य असल्याचं थोरात यांनी हायकमांडला कळवल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे पटोले प्रचंड अडचणीत सापडल्याची चिन्हे दिसत आहेत.

थोरात म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत राजकारण झालं. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. प्रकरण मिटवण्याऐवजी ते वाढवण्यात आले. सार्वजनिकरित्या कुटुंबाविरोधात वक्तव्य करण्यात आली. माझ्या विषयी इतका राग असेल तर नाना पटोले यांच्याबरोबर काम करू शकत नाही. तसेच परिस्थिती अशीच राहिली तर काँग्रेसमध्ये दोन गट होतील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

‘काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. विधानपरिषदेच्या राजकारणात आपल्याला भाजपमध्ये नेऊन पोहोचवलं. भाजपच्या तिकीटाचं वाटपसुद्धा करून टाकलं. काही लोक गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. आपली पुढील वाटचाल त्याच विचाराने होणार आहे,’ असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.

याआधी सत्यजीत तांबे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरच खळबळजनक आरोप केले. नाना पटोले यांच्याकडून नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. थोरात-तांबे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं गेलं आणि त्याची स्क्रीप्ट लिहिली गेली, असे आरोप सत्यजीत तांबे यांनी नाना पटोले यांच्यावर केले होते.