पुण्यात ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार ; पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराने जोर पकडला असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची नाराजी समोर आली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे नाराज असून ते कसबा क्षेत्ररक्षक पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीपुढील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणूक ठाकरे गटाने अशी आग्रमी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. कसबा विधानसभेबरोबरच चिंचवड पोटनिवडणूक लढविण्याचा निर्धारही पक्षाच्या बैठकीत करण्यात आला होता. मात्र कसब्यातून महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस उमेदवाराने निवडणूक लढवावी असा निर्णय घेण्यात आला.

ठाकरे गटाचे नेते आणि संपर्कप्रमुख सचिन अहिर उद्या पुण्याला जाणार आहेत. या दरम्यान विशाल धनवडे हे सचिन अहिर यांच्याकडे राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांची कडून मिळत आहे.विशाल धनवडे हे ठाकरे गटाचे नगरसेवक राहिले आहेत. ते कसबा पोटनिवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. या दरम्यान पक्षाच्या शहराध्यक्षांसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलीय. धनवडे यांनी शिवसैनिक म्हणून काम करत राहणार असा व्हॉट्सअॅप मेसेज केलाय.