शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासार्हतेचा सर्व्हेच होऊन जाऊ द्या – श्रीकांत भारतीय

जनताच ठरवेल कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा आणि कोणाच्या शब्दावर नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासार्हतेचा सर्व्हेच होऊन जाऊ द्या असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे नेते श्रीकांत भारतीय यांनी दिले आहे. अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांची संमती होती असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे.

शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ते नाकारले आहे. यावर सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना भारतीय म्हणाले पवारांच्या शब्दावर विश्वास की फडणवीसांच्या शब्दावर विश्वास याचा महाराष्ट्रात सर्वे होऊनच जाऊ द्या. महाराष्ट्रातील साडेतेरा कोटी जनतेला फडणवीसांच्या शब्दावर विश्वास आहे. पवारांच्या शब्दावर त्यांच्या घरच्या लोकांनाही विश्वास नाही. शरद पवार जरी आज हे फेटाळत असतील तरी महाराष्ट्रातील जनतेने आजपर्यंत शरद पवारांना पाहिलं आहे. त्यामुळं जनता ठरवेल त्यांच्या कोणत्या शब्दावर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या शब्दावर विश्वास ठेवायचा नाही. देवेंद्र फडणवीसांचा शब्द हा क्रिस्टल क्लिअर साफ असतो आणि तो सत्य असतो अजित पवार ही पवारच असल्यामुळे ते नंतर बदलले.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा भाजपा निवडून आणेल. त्यामुळे तयारी ही 100% आहे. निवडणूकीच्या अगोदर दीड ते दोन वर्ष अगोदर पासून तयारी सुरु आहे, असे सांगितले.सोलापूर लोकसभा आम्ही जिंकू. माढा लोकसभा आम्ही जिंकू आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा आम्ही जिंकू. जेव्हा लोकसभा आणि विधानसभेचे सर्व निकाल हाती येतील तेंव्हा तुम्हाला ही माझी वाक्य लक्षात येतील असेही भारतीय म्हणाले.